गडचिरोली, दि. ८ (जिमाका) : इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हास्तरीय कामकाज
आता गडचिरोली येथे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय
समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध आर्थिक विकास योजनांचा लाभ स्थानिक
स्तरावर उपलब्ध होणार आहे.
राज्य शासनाने इतर मागासवर्गीय समाजातील विविध घटकांच्या
आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळासह
विविध समाजघटकांसाठी १३ उपमहामंडळांची स्थापना केली आहे. यामध्ये लेवा पाटीदार
समाज आर्थिक विकास महामंडळ, सोळा
कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/वाणी समाज), स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास
महामंडळ, श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज
आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका
सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार
वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज), संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज), संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज), आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत
समाज), संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास
महामंडळ (गुरव समाज) तसेच संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (नाभिक समाज) यांचा
समावेश आहे.
महामंडळामार्फत पात्र लाभार्थ्यांसाठी विविध स्वयंरोजगार व
आर्थिक विकासाभिमुख अशा सहा महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये रु.
१ लाखांपर्यंतची थेट कर्ज योजना, वैयक्तिक
कर्ज व्याज परतावा योजना, २०
टक्के बीज भांडवल योजना, गट कर्ज व्याज
परतावा योजना, शैक्षणिक
कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यांचा समावेश
आहे. या सर्व योजना पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून अर्जदारांनी
आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.
पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी www.msobcfdc.org
या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर
करावेत. अर्ज प्रक्रियेसंदर्भात किंवा योजनांबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र
राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आयटीआय मागे, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा दूरध्वनी
क्रमांक ०७१३२-२२३०२४ वर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय समाजातील पात्र युवक, महिला, स्वयंरोजगार
इच्छुक तसेच उद्योजकांनी शासनाच्या विविध आर्थिक विकास योजनांचा लाभ घेऊन
स्वावलंबी बनावे, असे आवाहन
महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. के. के. सातपुते यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment