गडचिरोली, दि. २ (जिमाका) : गडचिरोली जिल्ह्यात वेगाने होत असलेल्या औद्योगिक व आर्थिक
परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर युवक, महिला, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी पारंपरिक रोजगाराच्या
चौकटीबाहेर पडून उद्योजकतेचा मार्ग स्वीकारावा. केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न
राहता स्वतःच्या मानसिकतेत सकारात्मक बदल, जिद्द, धैर्य आणि सातत्य जोपासल्यास यश निश्चित मिळू शकते, असे प्रेरणादायी आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी
केले.
भारत सरकारच्या स्टार्ट अप इंडिया अंतर्गत आयोजित 'तेजस' (TEJAS – Transforming Entrepreneurial
Journeys Across States & Districts) या
जिल्हास्तरीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करत होते. जिल्हा
नियोजन समितीच्या महा-स्ट्राइड उपक्रमांतर्गत आणि उद्योजकता संवर्धन व व्यवसाय
सुलभीकरण केंद्र ( Incubation cum Business Facilitation Centre ) यांच्या सहकार्याने आर. के. सेलेब्रेशन हॉल येथे
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, उद्योजकता संवर्धन व व्यवसाय सुलभीकरण केंद्राचे संचालक डॉ
शिवाजी धवड यांच्यासह जिल्ह्यातील नवउद्योजक, महिला
बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, विद्यार्थी, युवक
तसेच विविध शैक्षणिक संस्था व व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले
की, प्रशासन, बँका किंवा विविध संस्था आवश्यक ते मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सहकार्य देऊ शकतात; मात्र यशस्वी उद्योजक होण्यासाठी स्वतःची तयारी, ध्येयाप्रती निष्ठा आणि संकटांवर मात करण्याची क्षमता
महत्त्वाची असते. अनेक यशस्वी उद्योजकांनी अपयशाचा सामना करत सातत्याने प्रयत्न
केल्यानंतरच यश मिळविले आहे. त्यामुळे सुरुवातीच्या अडचणींनी किंवा अपयशाने खचून न
जाता नव्या कल्पनांवर विश्वास ठेवत सातत्याने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी
अधोरेखित केली.
जिल्ह्यात उद्योजकतेची सक्षम परिसंस्था उभारण्यासाठी
प्रशासनाने युवक, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, विद्यार्थी-युवतींचा कौशल्य विकास आणि जिल्ह्यातील लपलेल्या
प्रतिभेचा शोध या पाच प्रमुख घटकांवर विशेष भर दिला आहे, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन युवकांना कौशल्य
विकासाच्या माध्यमातून रोजगार व उद्योगाशी जोडणे, महिला बचत गटांना बाजारपेठ आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध करून
देणे, शेतकरी उत्पादक संस्थांच्या
माध्यमातून शेतीचे विविधीकरण आणि मूल्यवर्धन वाढविणे, स्थानिक युवक-युवतींना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण
देणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, सौर
ऊर्जा, जलविद्युत यांसारख्या नाविन्यपूर्ण
क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या प्रतिभावान युवकांना आवश्यक मार्गदर्शन व संधी
उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
बोदली येथे नुकतेच ७५० मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
देऊन त्यांना उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचा उल्लेख करत
त्यांनी आगामी पोलाद आणि खाण उद्योगांमध्ये स्थानिक युवक-युवतींसाठी मोठ्या
प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे सांगितले. या संधींचा लाभ
घेण्यासाठी आतापासूनच आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क क्षेत्र, समृद्ध वनसंपदा आणि कृषी संसाधने ही गडचिरोलीच्या विकासाची
मोठी ताकद असल्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी नमूद केले. मोहफुल, तेंदूपत्ता, चारोळी
यांसारख्या वनोपजांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया
उद्योग आणि प्रभावी विपणनाद्वारे स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळू शकते.
त्याचबरोबर मत्स्यपालन, बांबू आधारित उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी उत्पादक संस्थांच्या
माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम
राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गडचिरोली जिल्हा
परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर उभा असल्याचे सांगत, आगामी औद्योगिकीकरण, कृषी
प्रक्रिया, वनाधारित उद्योग, सेवा क्षेत्र आणि नवतंत्रज्ञानामध्ये निर्माण होणाऱ्या
संधींचा स्थानिक युवक, महिला व
नवउद्योजकांनी आत्मविश्वासाने लाभ घ्यावा, स्वतःचे
उद्योग उभारावेत आणि गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या संधी
उपलब्ध करून देण्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गडचिरोली, शिवाजी
महाविद्यालय, शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, लघुउद्योग भारती, आदर्श
महाविद्यालय देसाईगंज (वडसा) तसेच एम. जी. महाविद्यालय, आरमोरी आदी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी
जिल्हा उद्योग केंद्र, उमेद, माविम, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, नाबार्ड
तसेच उद्योजकता परिसंस्था मजबूत करण्यासाठी कार्य करणाऱ्या विविध विभाग व
संस्थांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे तसेच संबंधित
तज्ज्ञ मान्यवरांनी स्टार्टअप नोंदणी, वित्तीय
सहाय्य, उद्योग उभारणीची प्रक्रिया आणि
विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी संबंधित
अधिकारी उपस्थित होते.
0000







No comments:
Post a Comment