गडचिरोली, दि. २ जुलै (जिमाका): अनुसूचित
जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९
तसेच सुधारणा अधिनियम, २०१५ यांच्या प्रभावी
अंमलबजावणीसह नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने
नागरी हक्क संरक्षण विभाग, गडचिरोली यांच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात ३० जून २०२६ रोजी नागरी
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत कायद्याची अंमलबजावणी, नागरिकांचे अधिकार, सायबर
सुरक्षा, सामाजिक सक्षमीकरण आणि विविध शासकीय
योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अपर
पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन समाजकल्याण विभागाचे
सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी आणि राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त
सुशील चांदेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
कार्यशाळेत
सहाय्यक न्यायरक्षक अॅड. मोहम्मद सकलेन अब्दुल कलाम खान यांनी अनुसूचित जाती-जमाती
अत्याचार प्रतिबंधक कायद्याची उद्दिष्टे, महत्त्व, तरतुदी आणि प्रभावी अंमलबजावणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन
केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनेल अधिवक्ता अॅड. अरुण एम. अंजनकर यांनी
ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, त्यांचे सक्षमीकरण, संरक्षण आणि सन्मान याबाबत माहिती दिली.
सोसायटी
फॉर पीपल्स अॅक्शन इन रुरल सर्व्हिसेस अँड हेल्थ (SPARSH) चे
अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे यांनी अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या सध्याच्या
सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण करत सामाजिक न्याय आणि संवेदनशीलतेची गरज अधोरेखित
केली. सायबर पोलीस स्टेशन, गडचिरोलीचे दिवाकर तनमनवार
यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यापासून
बचावाचे उपाय आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तर बार्टीचे
प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांनी बार्टीच्या विविध योजना तसेच अत्याचार
प्रतिबंधक कायद्यांतर्गत शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मदत व पुनर्वसन
योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
या
कार्यशाळेला गडचिरोली जिल्हा पोलीस दल, जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण, समाजकल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)
यांचे अधिकारी व कर्मचारी, सुमारे २५० पोलीस पाटील तसेच
ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मीकांत
पाटील, पोलीस अधीक्षक, नागरी
हक्क संरक्षण, नागपूर परिक्षेत्र यांच्या
मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
महिला पोलीस शिपाई भारती बाचावार यांनी केले. नागरी हक्क संरक्षण पथकाचे प्रमुख
सहायक पोलीस निरीक्षक तीर्थदास निंबेकर, तसेच रमेश
उसेंडी, सविता उसेंडी, राजेंद्र
भोयर, जितकुवर विनायक आणि अतुल लोनबळे यांनी
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची प्रस्तावना
व आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक तीर्थदास निंबेकर यांनी केले.
0000


No comments:
Post a Comment