Monday, 17 August 2026

*शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारण : लोकसहभागातून सुरक्षित भविष्याकडे*

 

पाणी निर्माण करता येत नाही आणि वाहून गेलेली सुपीक माती सहजपणे पुन्हा मिळवता येत नाही. त्यामुळे आज जपलेला पाण्याचा प्रत्येक थेंब आणि वाचवलेला मातीचा प्रत्येक कण हा भावी पिढ्यांसाठी केलेली मौल्यवान गुंतवणूक आहे. शेती, पर्यावरण, जैवविविधता आणि मानवी जीवन या सर्वांचा पाया माती आणि पाणी आहे. म्हणूनच शाश्वत विकासाच्या वाटचालीत मृदसंधारण आणि जलसंधारणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


पाऊस हा आपल्याकडील पाण्याचा प्रमुख नैसर्गिक स्रोत आहे. मात्र पावसाचे पाणी वेगाने वाहून गेल्यास त्यासोबत सुपीक मातीही वाहून जाते. परिणामी जमिनीची धूप होते आणि पाण्याचा अपेक्षित लाभही मिळत नाही. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, त्याचा वेग कमी करणे आणि ते जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. पाणी जमिनीत मुरल्याने भूजल पुनर्भरणास मदत होते, तर मातीची धूप रोखल्याने जमिनीची उत्पादकता टिकविण्यास हातभार लागतो.


*माती आणि पाणी—एकमेकांना पूरक*


मृदसंधारण आणि जलसंधारण या स्वतंत्र बाबी नसून त्या परस्परपूरक आहेत. माती टिकली तर पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता टिकते आणि पाणी उपलब्ध राहिले तर शेती व वनस्पतींचे अस्तित्व बळकट होते. त्यामुळे शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच नाले, तलाव आणि विहिरींचे संवर्धन यासारख्या उपायांना महत्त्व आहे.


जलसंधारणाचा विचार केवळ पाण्याच्या उपलब्धतेपुरता मर्यादित नाही. त्याचा थेट संबंध शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेशी आहे. उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा आज योग्य आणि काटकसरीने वापर केला, तरच ती संसाधने उद्याच्या पिढ्यांसाठी उपलब्ध राहतील. हाच शाश्वत विकासाचा मूलभूत विचार आहे.


*जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप*


मृद व जलसंधारणाचे हे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.


माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारण क्षेत्रात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीदिनी २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जलसंधारणाबाबत जनजागृती करून या कार्याला व्यापक लोकसहभागाची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


या अभियानाचा महत्त्वाचा भाग म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. कमाल तीन किलोमीटरच्या या वॉकेथॉनमध्ये सहभागी नागरिक मृद व जलसंधारणाची शपथ घेणार आहेत. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही या उपक्रमाची थीम आहे. माती आणि पाणी वाचविण्याचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे आणि जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


*प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची*


जलसंधारणाची जबाबदारी केवळ शासन किंवा एखाद्या विभागाची नाही. शासन योजना आखू शकते, जलसंधारणाची कामे उभारू शकते आणि जनजागृती करू शकते; मात्र त्याचे दीर्घकालीन यश लोकसहभागावर अवलंबून आहे. शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला, स्वयंसेवी संस्था, उद्योग, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि प्रत्येक नागरिकाने या कार्यात आपापल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे.


घर, शेत, शाळा किंवा सार्वजनिक परिसरात पाण्याचा अपव्यय टाळणे, शक्य तेथे पावसाचे पाणी साठविणे व जमिनीत मुरविणे, उपलब्ध जलस्रोतांचे जतन करणे आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे अशा छोट्या कृतीदेखील व्यापक परिणाम घडवू शकतात. व्यक्तीच्या सवयीपासून गावाच्या नियोजनापर्यंत प्रत्येक स्तरावर ‘पाणी जपणे’ हा विचार रुजला पाहिजे.


जलसंधारण सप्ताह, जलसंधारण अभियान आणि ‘वॉक फॉर वॉटर’ यांसारखे उपक्रम याच लोकसहभागाला चालना देणारे आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने त्यात सहभागी होऊन मृद व जलसंधारणाचा संदेश पुढे नेला, तर शासकीय अभियानाचे रूपांतर खऱ्या अर्थाने लोकचळवळीत होऊ शकते.


आज अडवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब आणि वाचवलेला मातीचा प्रत्येक कण हा उद्याच्या पिढीसाठी केलेली गुंतवणूक आहे. माती आणि पाण्याचे संवर्धन ही केवळ आजची गरज नाही, तर सुरक्षित, समृद्ध आणि शाश्वत भविष्याची हमी आहे. म्हणून मृद व जलसंधारण ही केवळ योजना न राहता प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून उभी राहणारी लोकचळवळ बनली पाहिजे.


*- गजानन जाधव जिल्हा माहिती अधिकारी गडचिरोली.*

*जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देऊया – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल* *गडचिरोलीत १५ ते २१ ऑगस्ट जलसंधारण सप्ताह; २१ ऑगस्टला ३ किमी ‘वॉक फॉर वॉटर’* *मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभात अभियानाच्या लोगोचे अनावरण*

 

गडचिरोली, दि. १५




(जिमाका) : मृद व जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजवून जलसंवर्धनाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी जिल्ह्यात १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून २१ ऑगस्ट रोजी ३ किलोमीटरची ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक आणि विविध संस्थांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले आहे.


आज, १५ ऑगस्ट रोजी आयोजित मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभात जलसंधारण अभियानाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून अभियानात व्यापक लोकसहभाग निर्माण करण्यावर भर देण्यात आला.


माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील योगदानाच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.


*२१ ऑगस्टला ‘वॉक फॉर वॉटर’*


जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ या संकल्पनेवर ३ किलोमीटरची ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना तसेच नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


*QR कोड स्कॅन करून रील स्पर्धेत सहभागी होता येणार*


जलसंधारण सप्ताहानिमित्त १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक युवक-युवतींनी QR कोड स्कॅन करून स्पर्धेत सहभागी व्हावे. माती व पाणी संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, वृक्षारोपण आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण उपायांवर ३० ते ६० सेकंदांची रील तयार करता येणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.


याशिवाय शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, पोस्टर व वादविवाद स्पर्धा, जलसंधारण शपथ, वृक्षारोपण तसेच विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


जलसंधारण ही केवळ शासकीय मोहीम न राहता प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आणि व्यापक लोकचळवळ व्हावी. पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त संचय करून ते जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक आणि विविध संस्थांनी जलसंधारण सप्ताह, ‘वॉक फॉर वॉटर’ तसेच अन्य उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ मिलिंद नरोटे व जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

Wednesday, 5 August 2026

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; १७ ऑगस्टला प्रारूप तर १७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

 


गडचिरोली, दि. ५ (जिमाका) : राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांच्या पुनर्रचना व सुसुत्रीकरणाचे काम ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

            त्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे-हरकतींवर सुनावणी करून १५ ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

            पात्र नागरिकांनी या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावातील दुरुस्ती अथवा वगळण्यासंदर्भातील दावे व हरकती विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

0000

आपले सरकार सेवा केंद्र स्थापनासाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित

 


गडचिरोली, दि. 05 (जिमाका) : जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर 154 नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यात 151 ग्रामपंचायत स्तरावर 152 केंद्रे तसेच 2 नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर 2 केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. पात्र ग्रामपंचायतींची यादी, अर्जाचा नमुना व आवश्यक माहिती www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांच्या सूचना फलकावर उपलब्ध आहे.

        इच्छुकांनी 6 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सेतू शाखेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

0000

महिला लोकशाही दिन १७ ऑगस्ट रोजी

 

गडचिरोली, दि. ५ (जिमाका) : महिलांच्या विविध समस्यांचे निराकरण तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

या लोकशाही दिनात महिलांच्या विविध विभागांशी संबंधित वैयक्तिक तक्रारी, गाऱ्हाणी व अडचणींबाबत लेखी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये विहित नमुन्यात सादर करावेत. न्यायप्रविष्ट, सेवा विषयक किंवा अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

Friday, 10 July 2026

महाराष्ट्र हरित अभियानांतर्गत पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण; नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन वनसंरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जनसहभाग वाढविण्यावर भर - उपवनसंरक्षक दिपाली तलमले

 






गडचिरोली, दि. १० जुलै (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या 'महाराष्ट्र हरित अभियान २०२६' अंतर्गत वन विभागाच्या आल्लापल्ली वनविभागातील पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम तसेच नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उद्घाटनाचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला, तसेच त्यांच्या हस्ते पेडीगुड्डम वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले.

मिश्र रोपवन २०२६ उपक्रमांतर्गत कक्ष क्रमांक १८५, नियतक्षेत्र जामगाव, उपक्षेत्र गोमनी येथे पाच हेक्टर क्षेत्रावर विविध स्थानिक व उपयुक्त प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक दिपाली तलमले, उपविभागीय वनाधिकारी शिशुपाल पवार तसेच जामगावचे पोलीस पाटील अरविंद निखाडे यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.

उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना उपवनसंरक्षक तलमले यांनी वृक्षलागवड ही केवळ एकदिवसीय उपक्रम न राहता ती लोकचळवळ बनणे आवश्यक असल्याचे सांगितले. लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन, जैवविविधतेचे संवर्धन आणि वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या हस्ते पेडीगुड्डम वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यालयाची पाहणी करताना त्यांनी वनसंरक्षण, वनविकास, वृक्षलागवड, वनगुन्हे प्रतिबंध आणि जनसहभाग वाढविण्यासाठी नियोजनबद्ध व परिणामकारक पद्धतीने काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शासनाच्या विविध वनविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार, सर्व क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, वनमजूर, क्षेत्रीय कर्मचारी तसेच जामगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी "एक झाड लावा, पर्यावरण वाचवा" हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवडीबरोबरच रोपांचे संगोपन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास, जैवविविधतेचे संवर्धन होण्यास तसेच वनसंरक्षणाच्या प्रयत्नांना अधिक चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0000

 

 

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीप हंगाम २०२६-२०२७ मध्ये शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज भरून योजनेत सहभागी व्हावे

 


गडचिरोली, (जिमाका) दि.10 : राज्यात सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना शासन निर्णय दिनांक ३ जुलै २०२६ अन्वये लागू करण्यात आली आहे.  या शासन निर्णयामुळे अधिसूचित महसूल मंडळात, अधिसूचित पिकाचे चालू वर्षीचे सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई लागू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी भात व कापूस या 2 पिकांसाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजने सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना भात पिकासाठी हा विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागेल. कापूस व्यापारी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के राहील. विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ३१ जुलै २०२६ असून आता शेतकऱ्यांकडे २० दिवस बाकी आहे.

 केंद्र शासनाच्या पिक विमा पोर्टल वर ऑनलाईन सहभाग नोंदवता येईल [National crop insurance portal ( NCIP)]. यात भाग घेण्यासाठी बँक, कॉमन सर्विस सेंटर, किंवा स्वतः शेतकरी ऑनलाइन अर्ज भरून भाग घेऊ शकतो. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ऍग्री स्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक आहे. जमिनीची कागदपत्रे, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक, आधार संलग्न पेमेंट साठी ते बँक खात्यात जोडलेले असावे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे डिजिटल क्रॉप सर्वे करणे बंधनकारक आहे. डिजिटल क्रॉप सर्व मधील पीक व विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्वे मध्ये नोंदवण्यात आलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. या तफावत असल्यास विमा अर्ज रद्द होईल. चुकीच्या मार्गाने अर्ज करून गैरफायदा घेत असल्याशिवाय निदर्शनास आल्यास त्यांना पुढील पाच वर्ष कृषी विषयक योजनांपासून वंचित रहावे लागेल. योजनेत भाग घेण्यासाठी किमान ०.१० हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचण आल्यास शेतकरी संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा १४४४७ क्रमांक वर फोन करून माहिती घेऊ शकतात.

चालू वर्षी हवामान खात्याने पावसासंदर्भात दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षणाच्या दृष्टीने पिक विमा योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेत सहभागी होण्याकरिता आपल्या नजीकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरून ३१ जुलै २०२६ पूर्वी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती. प्रिती म. हिरळकर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी केलेले असुन या योजनेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

0000