पाणी निर्माण करता येत नाही आणि वाहून गेलेली सुपीक माती सहजपणे पुन्हा मिळवता येत नाही. त्यामुळे आज जपलेला पाण्याचा प्रत्येक थेंब आणि वाचवलेला मातीचा प्रत्येक कण हा भावी पिढ्यांसाठी केलेली मौल्यवान गुंतवणूक आहे. शेती, पर्यावरण, जैवविविधता आणि मानवी जीवन या सर्वांचा पाया माती आणि पाणी आहे. म्हणूनच शाश्वत विकासाच्या वाटचालीत मृदसंधारण आणि जलसंधारणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पाऊस हा आपल्याकडील पाण्याचा प्रमुख नैसर्गिक स्रोत आहे. मात्र पावसाचे पाणी वेगाने वाहून गेल्यास त्यासोबत सुपीक मातीही वाहून जाते. परिणामी जमिनीची धूप होते आणि पाण्याचा अपेक्षित लाभही मिळत नाही. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, त्याचा वेग कमी करणे आणि ते जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. पाणी जमिनीत मुरल्याने भूजल पुनर्भरणास मदत होते, तर मातीची धूप रोखल्याने जमिनीची उत्पादकता टिकविण्यास हातभार लागतो.
*माती आणि पाणी—एकमेकांना पूरक*
मृदसंधारण आणि जलसंधारण या स्वतंत्र बाबी नसून त्या परस्परपूरक आहेत. माती टिकली तर पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता टिकते आणि पाणी उपलब्ध राहिले तर शेती व वनस्पतींचे अस्तित्व बळकट होते. त्यामुळे शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच नाले, तलाव आणि विहिरींचे संवर्धन यासारख्या उपायांना महत्त्व आहे.
जलसंधारणाचा विचार केवळ पाण्याच्या उपलब्धतेपुरता मर्यादित नाही. त्याचा थेट संबंध शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेशी आहे. उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा आज योग्य आणि काटकसरीने वापर केला, तरच ती संसाधने उद्याच्या पिढ्यांसाठी उपलब्ध राहतील. हाच शाश्वत विकासाचा मूलभूत विचार आहे.
*जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप*
मृद व जलसंधारणाचे हे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारण क्षेत्रात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीदिनी २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जलसंधारणाबाबत जनजागृती करून या कार्याला व्यापक लोकसहभागाची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या अभियानाचा महत्त्वाचा भाग म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. कमाल तीन किलोमीटरच्या या वॉकेथॉनमध्ये सहभागी नागरिक मृद व जलसंधारणाची शपथ घेणार आहेत. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही या उपक्रमाची थीम आहे. माती आणि पाणी वाचविण्याचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे आणि जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
*प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची*
जलसंधारणाची जबाबदारी केवळ शासन किंवा एखाद्या विभागाची नाही. शासन योजना आखू शकते, जलसंधारणाची कामे उभारू शकते आणि जनजागृती करू शकते; मात्र त्याचे दीर्घकालीन यश लोकसहभागावर अवलंबून आहे. शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला, स्वयंसेवी संस्था, उद्योग, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि प्रत्येक नागरिकाने या कार्यात आपापल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे.
घर, शेत, शाळा किंवा सार्वजनिक परिसरात पाण्याचा अपव्यय टाळणे, शक्य तेथे पावसाचे पाणी साठविणे व जमिनीत मुरविणे, उपलब्ध जलस्रोतांचे जतन करणे आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे अशा छोट्या कृतीदेखील व्यापक परिणाम घडवू शकतात. व्यक्तीच्या सवयीपासून गावाच्या नियोजनापर्यंत प्रत्येक स्तरावर ‘पाणी जपणे’ हा विचार रुजला पाहिजे.
जलसंधारण सप्ताह, जलसंधारण अभियान आणि ‘वॉक फॉर वॉटर’ यांसारखे उपक्रम याच लोकसहभागाला चालना देणारे आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने त्यात सहभागी होऊन मृद व जलसंधारणाचा संदेश पुढे नेला, तर शासकीय अभियानाचे रूपांतर खऱ्या अर्थाने लोकचळवळीत होऊ शकते.
आज अडवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब आणि वाचवलेला मातीचा प्रत्येक कण हा उद्याच्या पिढीसाठी केलेली गुंतवणूक आहे. माती आणि पाण्याचे संवर्धन ही केवळ आजची गरज नाही, तर सुरक्षित, समृद्ध आणि शाश्वत भविष्याची हमी आहे. म्हणून मृद व जलसंधारण ही केवळ योजना न राहता प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून उभी राहणारी लोकचळवळ बनली पाहिजे.
*- गजानन जाधव जिल्हा माहिती अधिकारी गडचिरोली.*
No comments:
Post a Comment