Tuesday, 9 July 2019


महिला बचत गटांच्या नाविण्यपुर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी "हिरकणी - नवउद्योजक महाराष्ट्राची" योजना

आपल्या संकल्पना दि.१७ जुलै पुर्वी सादर करा.

गडचिरोली : राज्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासास चालना देण्यासाठी आणि देशातील बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पानांवर आधारीत उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने "महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट- अप धारण, २०१८ (Maharashtra State Innovative Start-up Policy, २०१८)" ला मान्यता दिली
आहे. सदर धोरणाच्या अनुषंगाने महिला बचत गटांच्या नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहित करुन स्टार्ट-अप संस्कृतीचा विकास करण्यासाठी 'हिरकणी - नवउद्योजक महाराष्ट्राची योजना' मंजूर करण्यात आली आहे.
योजनेचे लाभार्थी असे असतील :-
पुढिल यंत्रणांच्या अंतर्गत तयार केलेले, पंचसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गट (ग्रामीण आणि शहरी भागातील किमान एक वर्षापुर्वी स्थापन केलेले ) हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र असतील-
१. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM)
२. राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान (NULM)
३. महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM)
४. उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान (MSRLM)
खाजगी संस्थांद्वारे स्वतंत्रपणे तयार केलेले महिला बचत गट या योजनेत सहभागी होण्यास पात्र नाहीत.

गडचिरीलीमध्ये याबाबत पुढिल प्रमाणे अंमलबजावणी होणार आहे -
पहिल्या टप्यात तालुकास्तरीय माहितीसत्र दि.५ जुलै ते १२ जुलै दरम्यान घेतली जात आहेत. दुसऱ्या टप्यात तालुकास्तरीय संकल्पनांचे सादरीकरण दि.१३ ते १९ जुलै दरम्यान होणार आहे. याच वेळी उत्कृष्ट १० संकल्पनांच्या सादरीकरणाला प्रत्येकी ५०,०००रू अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या विजेत्यांची घोषणा दि.२१ जुलै रोजी केली जाणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरावरती दि.२२ ते २९ जुलै दरम्यान सादरीकरण होणार आहे. यातील उत्कृष्ठ सादरीकरण केलेल्या १० संकल्पनांना *प्रत्येकी २ लाख रुपये* अर्थसहाय्य दिले जाणार आहे. जिल्हास्तरावरील विजेत्यांची घोषणा दि. ३० जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान केली जाणार आहे तर बक्षिस वितरण दि.१५ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या नजिकच्या व्यवस्थापक, लोकसंचालित साधन केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ/ तालुका अभियान व्यवस्थापक (MSRLM)/ तहसिलदार कार्यालय/ तालुका गट विकास अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधावा, तरी जिल्ह्यातील सर्व
महिला बचत गटांना सदर स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या महिला बचत गटाचा विकास तसेच जिल्ह्याच्या विकासात हातभार लावण्यासाठी जिल्हा प्रशासन गडचिरोली तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
तरी इच्छुक बचत गटांनी त्यांच्या नाविण्यपुर्ण व्यावसायिक कल्पना बाबतचे प्रस्ताव सिलबंद लिफाफ्यात सहायक गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे दि १७.०७.२०१९ पर्यंत सादर करावेत.